अभिनेता सलमान खानला ‘सिकंदर’च्या प्रदर्शनाच्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. आज (30 मार्च) रोजी हा बहुचर्चित चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी ‘सिकंदर’ हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित हा चित्रपट विविध पायरेटेड साइट्सवर लीक झाला आहे. ‘तमिळरॉकर्स’, ‘मूव्हीरुल्ज’, ‘फिल्मीझिला’ आणि इतर विविध टेलिग्राम ग्रुप्समध्ये हा संपूर्ण चित्रपट एचडीमध्ये लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. या विविध साइट्सद्वारे बेकायदेशीररित्या चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी आणि ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी लिंक्स पुरवले जात आहेत.
पायरसीविरोधी कडक कायदे असूनही आणि बेकायदेशीर स्ट्रीमिंग साइट्सवर कारवाई सुरू असूनही बॉलिवूडसाठी पायरसी (बेकायदेशीररित्या चित्रपट ऑनलाइन लीक करणे) ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. ‘सिकंदर’ हा चित्रपट थिएटर्समधील कॅमकॉर्डर रेकॉर्डिंगमधून लीक झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅमकॉर्डर रेकॉर्डिंगमधून चित्रपट जलद गतीने एचडी गुणवत्तेत अपग्रेड केली जातात आणि काही तासांतच ती पायरेटेड साइट्सवर अपलोड केली जातात.
सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ‘तमिळरॉकर्स’, ‘मूव्हीरुल्झ’, ‘123 मूव्हीज’, ‘टेलिग्राम’ आणि इतर टोरंट वेबसाइट्सवर लीक झाला आहे. याआधी ‘पुष्पा 2: द रुल’, ‘छावा’, ‘स्त्री 2’, ‘कल्की 2898 एडी’, ‘सिंघम अगेन’, ‘भुल भुलैय्या 3’, ‘देवारा’, ‘पठाण’, ‘जवान’, ‘गदर 2’, ‘ॲनिमल’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपटसुद्धा ऑनलाइन पायरसीचा शिकार झाले आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समिक्षक कोमल नाहटा यांनी यासंदर्भात एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘सिकंदर’ लीक होणं हा सलमानसाठी मोठा फटका असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘कोणत्याही निर्मात्यासाठी ही अत्यंत वाईट गोष्ट असते. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच तो ऑनलाइन लीक झाला आहे. दुर्दैवाने साजिद नाडियादवाला यांच्या सिकंदर या चित्रपटाबाबतही हे घडलंय. काल रात्री निर्मात्यांनी अधिकाऱ्यांना 600 ठिकाणांहून चित्रपट हटवण्यास सांगितलं. परंतु तरीही जे नुकसान व्हायचं होतं ते झालंच. पायरसीचा प्रकार वाढतच चालला आहे. सलमानच्या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी याचा मोठा फटका बसू शकतो’, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.
‘सिकंदर’चे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी याआधी ‘कथ्थी’, ‘स्पायडर’, ‘थुप्पक्की’ आणि ‘सरकार’ यांसारख्या लोकप्रिय तमिळ चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. 2008 मध्ये त्यांनी आमिर खानच्या ‘गजिनी’चंही दिग्दर्शन केलं होतं.



