फलटण – दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी विकी काकडे या युवकाने त्याच्या मामा श्री. प्रदीप गायकवाड यांच्यासोबत त्यांच्या मुलाचा मोबाईल चोरीला गेल्याच्या संदर्भात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रार देऊन ते पोलीस स्टेशनच्या बाहेर आले असता, पोलीस स्टेशन समोरच्या पार्किंगमधून एक दुचाकी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यावर विकी काकडे आणि प्रदीप गायकवाड यांनी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पोलीसांना सर्व प्रकार सांगितला. यावर पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी व्यक्ती विकी काकडे यांची दुचाकी घेऊन जाताना दिसला.
त्यामुळे, विकी काकडे यांच्या मामा श्री. प्रदीप गायकवाड यांच्या नावाने दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेत, विकी काकडे आणि प्रदीप गायकवाड यांना एका दुहेरी संकटाचा सामना करावा लागला आहे. मोबाईल चोरीला गेल्यावर न्यायाच्या शोधात असलेला युवक, पोलीस स्टेशन समोरच दुचाकी चोरीला जात असल्याचे पाहात आहे. जिथे कायद्याचा व पोलिसी वचक सर्वाधिक असावा अशी अपेक्षा असताना, पोलीस स्टेशनच्या समोरच चोरी घडणे आश्चर्यकारक आणी चिंताजनक आहे



