Lonand Accident News | लोणंद अपघात; दुचाकीस्वार ठार
पुढारी
लोणंद : लोणंद – शिरवळ रोडवर लोणंदच्या एमआयडीसी नजीक मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक देवून झालेल्या अपघातामध्ये नीलेश भालचंद्र गाढवे (वय 35, रा लोणंद) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिलेले अज्ञात वाहन पसार झाले आहे.
लोणंद येथील नीलेश भालचंद्र गाढवे हे मोटारसायकलवरुन (क्र. एमएच 11आर-5863) शिरवळकडून लोणंदकडे येत असताना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला शिरवळकडे जाणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा जोरदार होता की नीलेश गाढवे यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नीलेश गाढवे यांचा मित्रपरिवार व लोणंद पोलिस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी फलटण येथे पाठवण्यात आला. निलेश गाढवे चांगले हॅन्डबॉल खेळाडू होते. त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. तपास सपोनि सुशील भोसले करीत आहेत.



