फलटण : ना . जयकुमार गोरे आणि माझ्यात काही वैयक्तिक वैर नाही . गोरेंना असं वाटतंय की मीच त्यांच्याविरुद्ध सगळं करतोय . देव त्यांना सद्बुद्धी देवो . माझ्या शुभेच्छा त्यांना आहेत . त्यांनी त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा , सत्तेचा वापर गोरगरिबांची कामे करण्यासाठी करावा . माझं वाढलेलं वय पाहता सल्ला देण्याचा मला निश्चित अधिकार आहे . त्यावेळेस फासेच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल अडी निर्माण झालीय . त्यांना सांगण्याचाही मी प्रयत्न केला होता . योग्य वेळी मी त्यांना पुन्हा सांगेन . आज मी माझ्या तोंडाला जरा सेन्सॉरशिप लावलीय , योग्य वेळी सेन्सॉरशिप उठेल , त्यावेळी सगळं बोललं जाईल , असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे ना . निंबाळकर यांनी केले . कोळकी ( ता . फलटण ) येथेविविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण , जि . प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना . निंबाळकर , बाळासाहेब शेंडे , धनंजय पवार , रेश्माताई भोसले , कोळकी ग्रामपंचायत सरपंच अपर्णा पखाले व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . आ . रामराजे पुढे म्हणाले , ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने एकही कार्यकर्तानिर्माण करता आला नाही , ठेकेदारांना बिलं काढणार नाही , पोलिसांना सांगून आत टाकेन , तुझा आगवणे करीन अशा धमक्या देऊन प्रशासकीय दहशत दाखवून कार्यकर्ते फोडत आहेत . अशांचा तिरस्कार करायला मतदार घाबरतात याचे मला आश्चर्य वाटतं . आमच्या पूर्वजांनी आम्हाला जातीपातीचे राजकारण शिकवलं नाही . जातीपातीच्या राजकारणाचे संस्कार आमच्यावरनाहीत . मी कधीही जातीचे राजकारण करणार नाही . पैसेवाला व गरजू या दोनच जाती आहेत . गरीब गरजूंसाठी राजकारण केलंय , यापुढेही त्यांच्यासाठीच राजकारण करत राहणार आहे . आमच्या जीवात जीव असेपर्यंत फलटणच्या जनतेकडे जातीच्या मताचे गट्टे म्हणून कधीही बघणार नाही . ती आमची जनता आहे याच भावनेने त्यांच्याकडे बघत राहणार . आजवर कार्यकर्त्यांना सांभाळण्यात आमचा जीव गेला आता ती चूक आम्ही करणार नाही . यापुढेमतदारांच्या भविष्यासाठीच आमचं राजकारण राहील . कार्यकत्यांना सर्व काही दिले . पण स्वार्थासाठी ते सोडून गेले . जे कार्यकर्ते सोडून गेलेत तो आमचा अपमान नव्हे तर आमच्या शब्दावर ज्यांनी त्यांना मतं दिली . त्यांना मोठं केलं . त्या जनतेचा तो अभ्यास अपमान आहे . तीच जनता याचा निश्चितच हिशेब केल्याशिवाय राहणार नाही . कृष्णा खोरे लवादाचा केल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे १२० टीएमसी पाणी मी वाचवू शकलो याचं मला समाधान आहे.
संजीवराजे म्हणाले , कोळकीने माझी ओळख निर्माण केली आहे . हे मी कधी विसरणार नाही . सौर उर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजना सुरू करणारी कोळकी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे . कोळकीच्या मतदारांनी सतत पाठराखण केली आहे . विरोधकांकडून व्यावसायिकांवर दबाव टाकला जात आहे . तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत . रास्त व कायदेशीर व्यवसाय बंद पडू देणार नाही . कार्यकर्त्यांनो , विकास कामाची चिंता करू नका . आ . रामराजे यांच्या शब्दाला राज्यात आजही किंमत आहे . सत्ता असो नसो जनतेत – राहून जनतेची विकास कामे करीतच राहणार . तिथे कोणी विकास कामात आडवा आला तर त्याला आडवा करण्याची ताकद आमच्यात आहे हे विसरू नका , असा निर्वाणीचा इशाराही संजीवराजे यांनी विरोधकांना दिला .



