बारामतीच्या लखोबा लोखंडेने मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडमधील काही उद्योजकांनादेखील कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे . याबाबत आता छत्तीसगडच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली असून , या लखोबाला म्हणजे आनंद सतीश लोखंडे ( 28 ) आणि त्याची बहीण विद्या सतीश लोखंडे ( 24 , दोघेही रा . जळोची , ता . बारामती ) यांना येत्या 2 मे रोजी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश छत्तीसगड पोलिसांनी दिले आहेत . विशेष म्हणजे महाराष्ट्रात उद्योजक आणि मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर अद्याप अटक करण्यात आलेली नाही . बारामतीत डेअरी फर्मसह विविध कंपन्या स्थापन करुन आपण फार मोठे उद्योजक असल्याचे भासवून बारामतीच्या लखोबा लोखंडेने मंत्रालयातील अनेक
बड्या अधिकाऱ्यांना आपल्या व्यवसायात गुंतवणूक करायला लावून त्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते . याबाबत मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेकडे या बड्या अधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत . त्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे . यामध्ये आनंद लोखंडे आणि विद्या लोखंडे यांच्याविरोधात यापूर्वी 10 कोटी 21 लाख 59 हजार 367 रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली आहे . आता लखोबा बहीण भावाने गेल्या वर्षी 2024 मध्ये छत्तीसगडमधील रायपूरच्या आनंद इंडस्ट्रीजचे मालक प्रार्थी शंकर नाथानी यांना संपर्क करून 25 मेट्रिक टन गायीचे लोणी खरेदी करण्याचे आमिष दाखवून माल उचलला . मात्र , दरवेळी पेमेंट नंतर देण्याचे सांगत पैसे दिलेच नाही . या उद्योजकाने आपली 1 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर छत्तीसगड आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे , याबाबत येत्या 2 मे रोजी चौकशी होणार आहे .
तर अशाच प्रकारे आनंद लोखंडे याने पुणे शहरातील सैन्य दलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फ्लॅट देण्याच्या आमिषाने दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे . मात्र , केवळ चौकशीच्या पुढे कोणतीच कारवाई होत नसल्याने या लखोबाला कोण वाचवतंय , असा सवाल उपस्थित होत आहे . पुढाऱ्याच्या वरदहस्तामुळे कारवाई होईना बारामती तालुक्यातील नेत्याची जवळीक सांगून अनेकांना गंडवणाऱ्या आनंद लोखंडे याच्याविरोधात पुणे , मुंबई तसेच इतर वेगवेगळ्या राज्यांत तक्रारी करण्यात येत आहेत . मात्र , या लखोबाचा जबाब घेण्यापुढे कोणतीच कारवाई होत नाही . काही नेत्यांची नावे सांगून तो आपण काहीच केले नाही , अशा अविभार्वात वावरत आहे . हा लखोबा एका राजकीय पुढाऱ्याच्या मोठ्या कंपनीचे लेटर दाखवून वेगवेगळ्या उद्योजक आणि बड्या अधिकाऱ्यांना गंडा घालत आहे . त्यामुळे एक दिवस लखोबाबरोबर तो पुढारीदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे .



