फलटण –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ, फलटण येथे रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी धम्मदेसनेचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे सचिव तसेच चैत्यभूमी, मुंबई येथील सन्माननीय आ. भंते बुद्धपुत्र सुमेध बोधी (A) यांनी प्रमुख धम्मदेशक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भंते बुद्धपुत्र सुमेध बोधी यांनी आपल्या प्रेरणादायी धम्मदेशनेत सांगितले की, “बुद्ध धम्म म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हा मार्ग समजून घेण्यासाठी प्रत्येक घरी व विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे वाचन नियमितपणे होणे आवश्यक आहे. याशिवाय वर्षावास कार्यक्रम प्रत्येकवर्षी होणे ही काळाची गरज आहे.”
भंतेजींनी मंगळवार पेठेतील नागरिकांना आवाहन केले की, प्रत्येक चौकात, गल्लीबोळात चारिका (धम्मप्रसार यात्रा) व्हावी जेणेकरून बौद्ध धम्माचे ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.
कार्यक्रमास विविध मान्यवर, स्थानिक नागरिक व बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप “नमो बुद्धाय” च्या घोषात करण्यात आला.



