फलटण – फलटण नगरपरिषदेचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असा झाला आहे. प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते विकासाचा बोजवारा उडाला असून, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक नरकयातना भोगत आहेत. या अन्यायाविरोधात आता प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी रणशिंग फुंकले असून, थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात लेखी तक्रारीचा बॉम्ब टाकला आहे. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश असतानाही प्रशासन कोणाचे पाय धरून बसले आहे, असा संतप्त सवाल आता फलटणच्या गल्लीबोळातून विचारला जात आहे.
या प्रभागातील रस्त्यांच्या कामाचा ठेका ‘व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन’ला देऊन प्रशासनाने जणू जनतेच्या नशिबी खड्डेच लिहून ठेवले आहेत. वर्क ऑर्डरची मुदत संपूनही ह. बा. कुलकर्णी ते रवी शिंदे गिरण रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना आणि परडेकर मठासह अनेक रस्ते आजही अर्धवट अवस्थेत धूळ खात पडले आहेत. विशेष म्हणजे, या ठेकेदाराला तीनवेळा नोटिसा देऊनही त्याने नगरपरिषदेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तरीही प्रशासन या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी का घालत आहे? जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश धाब्यावर बसवण्याची हिंमत प्रशासनात येते कुठून? हे आता तपासावे लागणार आहे.
भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे, ज्या ठेकेदाराने आधीची कामे पूर्ण केली नाहीत, त्यालाच पुन्हा दुसऱ्या निविदेतून नवीन काम देऊन ‘अनुचित लाभ’ मिळवून देण्याचा घाट घातला जात असल्याचा खळबळजनक संशय खानविलकर यांनी व्यक्त केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरसिंह भाऊसाहेब खानविलकर यांनी उपोषण केले होते, तेव्हा तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन बोळवण केली. मात्र, ते आश्वासन केवळ कागदावरच राहिले. प्रशासनाच्या या विश्वासघातामुळे जनतेचा संयम आता सुटला आहे.
आता चर्चा किंवा विनवण्या करण्याचा काळ संपला आहे. जर प्रभाग १० मधील रखडलेली सर्व कामे तातडीने सुरू झाली नाहीत, तर तीव्र आंदोलनासह ‘आत्मदहन’ करण्याचा टोकाचा इशारा देण्यात आला आहे. या संघर्षात जर काही अघटित घडले, तर त्याला केवळ आणि केवळ फलटण नगरपरिषदेचे भ्रष्ट आणि सुस्त प्रशासनच जबाबदार असेल. या इशारावजा तक्रारीमुळे आता सत्ताधारी आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
फलटण नगरपरिषदेची मुजोरी आणि ठेकेदाराचे ‘लाड’कोण करित आहे..प्रभाग १० मधील जनतेला आता आत्मदहनाचाच पर्याय?
Leave a comment



