फलटण प्रतिनिधी : फलटण शहरातील वाढते दारुचे गुत्ते तात्काळ बंद करण्यात यावेत , अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांनी केली आहे . ही मागणी 1 जानेवारी पर्यंत मान्य न झाल्यास येत्या 26 जानेवारी ( प्रजासत्ताक दिनी ) सातारा येथील कार्यालय येथे जिल्हाधिकारी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे . दारुच्या अतिरेकामुळे शहरातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून महिला , लहान मुले व युवकांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत . अवैध व अधिकृत दारू विक्रीमुळे गुन्हेगारी , घरगुती हिंसाचार व आर्थिक अडचणी वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .
या मागणीसंदर्भात आज फलटण शहर पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले . निवेदनात दारुचे गुत्ते तात्काळ बंद करावेत , संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच शहरात शांतता व सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत , अशी मागणी करण्यात आली आहे . प्रशासनाने व पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी , अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल , असा इशाराही संग्राम अहिवळे यांनी दिला आहे .



