उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही , त्यांची ताकद नसल्यामुळे नाइलाजाने एकत्र आले आहेत , अशी टीका भाजपचे नेते करत आहेत . उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांना एकत्र येण्याचा अधिकार आहेच , पण तरीही त्यामुळे अमित साटम , राम कदम वगैरेंची मळमळ बुलेट ट्रेनच्या वेगाने बाहेर येऊ लागली आहे . दोन भावांमध्ये काड्या करण्याचा त्यांचा लघुउद्योग अद्यापही थांबलेला नाही ! परंतु भाजपाला येथे एका गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल . 1985 सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने 161 जागा जिंकल्या , तर पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोद या आघाडीचे 104 आमदार निवडून आले होते . त्यामध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे 55 , जनता पक्षाचे 20 , – भाजपचे 16 आणि शेकापचे 13 आमदार होते . अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या . शरद पवारांना सतत लाखोली वाहणाऱ्या भाजपने पुलोद आघाडीमध्ये राहून तेव्हा ती निवडणूक का लढवली ? 1978 मध्ये पुलोद सरकारमध्ये जनसंघ होता . परंतु किमान 1980 मध्ये भाजपची रितसर स्थापना झाल्यानंतर तरी भाजपने स्वबळावर निवडणुका का लढवल्या नाहीत ?
1985 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून मशाल चिन्हावर लढलेले छगन भुजबळ मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते . या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता . त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले , तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची तत्त्वे झुगारून दिली , असे कसे म्हणता येईल ? खुद्द बाळासाहेबांनीच पवारांशी तेव्हा दोस्ती केली होती . आणि उद्धव ठाकरेंना याबद्दल दूषणे देणाऱ्या भाजपने देखील तेव्हा पवारांचीच साथ केली होती . शिवाय शेवटी शरद पवार हे मूळ काँग्रेसवालेच . नेहरू – गांधी यांच्या काँग्रेस विचारांनाच मी मानतो , असे शरद पवार नेहमीच म्हणत होते व आहेत . म्हणजे आपण काँग्रेस विचार मानणाऱ्या पवारांशी साथ केली तर ते पुण्य , परंतु उद्धव ठाकरेंनी तसे केले , तर मात्र ते पाप , अशी भाजपची ही लबाडीचीदुहेरी निती आहे . भाजपने अन्य कोणाशीही युती केली , अगदी पवारांशी , तरी ते योग्य , परंतु उद्धव आणि राज एकत्र आले , तर ते मात्र चूक कसे ? आपल्या बरोबर असल्यास , तेव्हा त्या पक्षाला गृहीत धरायचे आणि तो विरोधात गेला की तो पक्ष ‘ राष्ट्रद्रोही , जनताद्रोही ‘ अशी बोंब ठोकायची , ही भाजपची रीत आहे . आपल्या विरोधात कोणी गेले की ते मात्र स्वार्थी राजकारण , असा भाजपचा कांगावा असतो ! भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाच्या सुरात सूर मिसळणारी एकनाथ शिंदे यांची ‘ कोरस सेना ‘ यांची ठाकरे बंधूंवरील टीका , ही मतलबी स्वरुपाचीच आहे . लोकसभेच्या वेळी भाजपला मनसेचा उपयोग झाला . पण ‘ मतलब निकल गया है तो , पहचानते नहीं , यूँ जा रहे है , जैसे हमें जानते नहीं , हीच भाजपची नीती आहे . 2029 मध्ये ” अजितदादा यांचा ‘ सिंचन गट ‘ आणि शिंदे यांचा समृद्ध ‘ गट यांनादेखील हाच अनुभव येणार आहे



