फलटण : आगामी फलटण हेरिटेज मॅरेथॉन (07 डिसेंबर 2025)मध्ये देशभरातून येणाऱ्या धावपटूंना स्वच्छ, ऐतिहासिक आणि आकर्षक फलटणचे दर्शन घडावे, या उद्देशाने दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी फलटण रनर्स फाऊंडेशन व नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सजाई गार्डन ते विंचूर्णी रोड या मार्गावर प्लास्टिक कचरा निर्मूलनाची भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ग्रामपंचायत जाधववाडी आणि मुधोजी कॉलेज, फलटण येथील प्राणीशास्त्र विभाग यांचा अत्यंत सक्रिय व प्रेरणादायी सहभाग. दोन्ही संस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वयंसेवक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना घेऊन या मोहिमेत सहभागी होत स्वच्छता चळवळीला बळ दिले.
सकाळी 7 ते 10 या वेळेत संपन्न झालेल्या या मोहिमेत विद्यार्थी, युवक-युवती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी अशा शेकडो लोकांनी सहभाग नोंदवला. रस्त्याच्या दुतर्फी असलेला प्लास्टिक कचरा जमा करून संपूर्ण परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि पर्यावरणपूरक करण्यात आला.
या उपक्रमामुळे फक्त मार्गाचाच सौंदर्यवर्धन झाला नाही, तर स्वच्छता हीच जबाबदारी हा संदेश नागरिकांच्या मनात दृढपणे रुजला. नागरिकांनीही अशा उपक्रमांचे सातत्य वाढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आयोजक संस्थांनी सर्व सहभागी घटकांचे मनःपूर्वक आभार मानत, “फलटणला पर्यावरणपूरक, आरोग्यदायी व प्रेरणादायी शहर बनविण्यासाठी अशा संयुक्त उपक्रमांची गरज आहे” असे मत व्यक्त केले. आगामी मॅरेथॉनसाठी हा उपक्रम निश्चितच फलटणची सकारात्मक आणि सुजाण प्रतिमा दर्शवणारा ठरला आहे.



