सध्या “फुले” या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनावर ब्राह्मण महासंघ व हिंदू महासंघाने घेतलेल्या आक्षेपांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे.
हा निर्णय फक्त एका चित्रपटाबाबत नसून, तो सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहावर घाला घालणारा आहे.
ज्यांनी शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, जे पती-पत्नी म्हणून सामाजिक क्रांतीचे अग्रदूत ठरले, त्या सावित्रीबाई व जोतिराव फुल्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कलाकृतीला विरोध का?
फुले दाम्पत्याने ब्राह्मणशाही, वर्णव्यवस्थेचा, अंधश्रद्धेचा आणि धर्मसत्तेचा ज्या ठामपणे पर्दाफाश केला – ते सत्य आजही काही उच्चवर्णीय ब्राह्मण व हिंदू संघटनांना झेपत नाही. त्यांच्या डोळ्यात खुपणारे सत्य समोर येऊ नये, म्हणून हे संघटनात्मक दबाव टाकले जात आहेत. ही केवळ अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा नाही, तर संपूर्ण बहुजन समाजाच्या विचारमूल्यांवर घाला आहे.
चित्रपटात काय चुकीचं दाखवलं गेलं आहे?
एखाद्या तपशीलावर आक्षेप असल्यास, तो सेन्सॉर बोर्डासमोर मांडावा ना – मग संघटनांचा हस्तक्षेप कशासाठी?
ब्राह्मण समाजाच्या व हिंदू धर्माच्या नावाने अशा प्रकारे विरोध करणाऱ्या संघटना सर्व ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करतात का?
या प्रश्नांची उत्तरं शोधली तर एक गोष्ट स्पष्ट होते – ही लढाई कलाविषयक नसून, सामाजिक वर्चस्वाच्या पुरस्कर्त्यांची आहे.
फुले हे नाव उच्चारणंही ज्यांना जड जातं, त्यांना त्यांच्या विचारांचा प्रसार होणं खटकणारच!
ब्राह्मण महासंघ व हिंदू महासंघाने लक्षात ठेवावे आता काळ बदलतोय. आजचा बहुजन तरुण विचार करतोय, अभ्यासतोय.
सोशल मीडियावरून, पुस्तके व चित्रपटांमधून त्याला सत्य शोधायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विरोध जितका वाढेल, तितका ‘फुले’ अधिक लोकांपर्यंत पोहोचतील.
म्हणून हे लक्षात ठेवा
चित्रपट प्रदर्शित पुढे-मागे होईल, पण फुले दाम्पत्याच्या विचारांची क्रांती थांबणार नाही.
कारण ही लढाई एका चित्रपटाची नाही ती समतेच्या स्वप्नांची आहे. प्रभा मीद्दडी..



