बारामती :- ‘ तू मला खूप आवडतेस , माझं तुझ्यावर प्रेम आहे . तू मला होकार दे , तू जर नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन , ‘ असं म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातील बारामतीत घडली आहे . या प्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आदित्य साळुंके ( रा . वडगाव निंबाळकर , ता . बारामती ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने याबाबत फिर्याद दाखल केली आहे
फिर्यादीने नमूद केल्यानुसार 22 जानेवारी ते 26 एप्रिल या कालावधीत सोमेश्वरनगरमधील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला . फिर्यादी तरुणी महाविद्यालयात अभ्यास करत असताना आदित्य साळुंके याने तिच्याजवळ जात तिच्याकडे वाईट भावनेनं पाहिलं . ‘ तू मला होकार दे , ‘ असं म्हणून त्याने फिर्यादीला त्रास दिला . ‘ तू नाही म्हणालीस , तर मी फाशी घेईन , ‘ असं सांगत फिर्यादीला ब्लॅकमेल केलं . तरुणीने त्याला ‘ माझ्या मागे मागे येऊ नकोस , तू माझ्यापेक्षा लहान आहेस , माझ्या मनात तुझ्याविषयी काही भावना नाहीत , असं स्पष्टपणे सांगितलं . तरीही त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला . फिर्यादीने त्याच्या भावाला बोलावून घेते असं सांगितले . शिवाय ती दप्तर घेऊन बाहेर पडत असतानाही त्याने तिला जिन्यात अडवले . ‘ तू माझ्या घरच्यांना याबाबत काही सांगितलं तर मी फाशी घेईन , ‘ अशी धमकीही त्याने दिली .
त्यामुळे तरुणीने तिच्या घरी हा प्रकार सांगितला आणि पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली . या घटनेनंतर मोठी खळबळ उडालीये . गेल्या काही दिवसांपासून हा तरुण मुलीला त्रास देत होता . हेच नाही तर तिने सांगूनही तो तिच्या मागे मागे जात होता . त्याने फाशी घेण्याची धमकी दिल्यानंतर तरुणीने घडलेला सर्व प्रकार हा तिच्या घरी सांगितला . यानंतर पोलिसांनी विनभंगाचा गुन्हाही दाखल केला



