गोळेवाडी (ता. फलटण):
वाठार निंबाळकर येथील गोळेवाडी परिसरात एका घराजवळील पायऱ्यांवर रात्रीच्या सुमारास एक साप काहीतरी खात असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. पाहणाऱ्यांना याची भीती वाटली आणि त्यांनी तात्काळ नेचर अॅण्ड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी (NWWS), फलटण या संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेतील टीमच्या बचाव पथकात काम करणारे रवींद्र लिपारे व जयेश शेट्ये हे काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान लक्षात आलं की तो साप म्हणजे भारतातील एक अतिविषारी प्रजातीचा मण्यार (Common Indian Krait) जातीचा असून तो एका बिनविषारी गवत्या ( Green Keelback) जातीच्या सापाची शिकार करत होता. बचाव पथकातील सदस्यांनी अन्नसाखळीतील नैसर्गिक प्रक्रियेला बाधा न आणता सापाला पूर्णपणे अन्न सेवन करू दिल आणि त्यानंतर अत्यंत सुरक्षितरीत्या त्याला पकडून स्थानिकांच्या गर्दीतून बाहेर काढले व त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
यावेळी NWWS या संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित नागरिकांना या सापाविषयी मूलभूत माहिती देताना सांगितले की मण्यार हा साप रात्रीचा सक्रिय असतो तसेच अतिविषारी असून देखील स्वभावाने शांत असतो व सहसा चावत नाही. मण्यार हा मुख्यतः इतर सापांना खाणारा साप म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सापांच्या संख्येवर नियंत्रण ठेऊन हा साप अन्नसाखळी राखण्यास मदत करतो.
तसेच या वेळी NWWS संस्थेने नागरिकांना आवाहन केले की साप दिसल्यास घाबरू नये, त्याला मारू नये, तर तात्काळ संस्थेशी किंवा स्थानिक वनविभागाशी संपर्क साधावा.
संपर्क क्र : 7588532023



