महाराष्ट्राचे ४ वाघ काळाच्या पडद्याआड गेल्या तीन दिवसांत भारतीय सैन्यातील महाराष्ट्राच्या चार जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे . या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे : जवान वैभव श्रीकृष्ण लहाने ( अकोला ) : काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरगती . नायक विलास विठ्ठल गावडे ( बरड , फलटण ) : दक्षिण आफ्रिका शांतता मोहिमेवर असताना शहीद . जवान अभिजीत माने ( भोसे , कोरेगाव ) : दक्षिण आफ्रिका मोहिमेवर असतानाच वीरमरण . जवान प्रमोद परशुराम जाधव ( दरे , सातारा ) : नियतीचा क्रूर खेळ ; अवघ्या 8 तासांच्या तान्हुल्या बाळाला डोळे भरून पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला .उत्सव नाही , तर वीर जवानांना श्रद्धांजली ‘ रामराजे – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त लक्ष्मी विलास पॅलेस येथे तिळगुळ समारंभाचे मोठे आयोजन करतात . मात्र , आपल्याच मातीतील आणि जिल्ह्यातील तरुण जवान शहीद झाल्याने त्यांनी हा सोहळा न साजरा करण्याचा निर्णय घेतला . ” आपल्या जिल्ह्याने आणि राज्याने चार हिरे गमावले आहेत . या वीर जवानांच्या बलिदानापुढे कोणताही सण मोठा नाही . त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत , ” अशा भावना व्यक्त करत रामराजेंनी याजवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे . जिल्ह्यावर दुःखाचे सावट एकीकडे मकर संक्रांतीच्या सणाची तयारी सुरू असताना , सातारा जिल्ह्यातील तीन घरांचे आधारस्तंभ कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . विशेषतः जवान प्रमोद जाधव यांच्या निधनाने जनमानस सुन्न झाले आहे . या वीर सुपुत्रांच्या सन्मानार्थ फलटणमधील तिळगुळाचा शासकीय व सामाजिक कार्यक्रम रद्द करून रामराजेंनी एक संवेदनशील आदर्श समोर ठेवला आहे .



