२२ जुलै १९२४ रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा पुण्यातील मार्केट यार्ड येथे बसवल्यावर जुलै १९२५ मध्ये स्वातंत्र्य सैनिक देशभक्त केशवराव जेधे ज्यांचे नाव पुण्यातील स्वारगेट येथील पुलाला दिलेले आहे त्यांनी जुलै १९२५ मध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा तत्कालीन पुणे नगरपालिकेने २० हजार रुपये खर्च करून पुण्यात सार्वजनिक ठिकाणी बसवावा असा ठराव नगरपालिकेत पाठवला. याला तत्कालीन मनूवाद्यांनी प्रचंड विरोध केला महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यात नको तर कोल्हापूर मध्ये बसवावा अशी भूमिका तत्कालीन मनुवाद्यांनी मांडली.
या गोष्टीचा संताप अनावर होऊन सत्यशोधक विचारवंत दिनकरराव जवळकर यांनी बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर टिकेची सुमने उधळणारे ‘देशाचे दुष्मन’ हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकाच्या विरोधात तत्कालीन मनुवाद्यांनी न्यायालयात धाव घेऊन फिर्याद दिली. १५ सप्टेंबर १९२६ रोजी या खटल्याचा निकाल लागला. पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर, मुद्रक लाड यांना एक वर्ष साधी कैद व अडीचशे रुपये दंड अशी शिक्षा सांगण्यात आली. तर देशभक्त केशवराव जेधे व प्रस्तावना लेखक बागडे यांना प्रत्येकी सहा महिने कैद व शंभर रुपये दंड अशी शिक्षा सांगण्यात आली. १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर जामीन होईपर्यंत जेधे-जवळकर-बागडे येरवडा तुरुंगात होते.
तत्कालीन मनुवाद्यांच्या विरोधात जाऊन जेधे-जवळकर आणि पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे बागडे व मुद्रक लाड यांचे वकीलपत्र मुंबईत कोणीही घेण्यास त्यावेळी तैयार न्हवते. त्यासाठी पुढे सरसावले ते भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी नुकतीच वकिली सुरू केली होती आणि या ऐतिहासिक खटल्याचे वकीलपत्र मुंबईत कोणीही घेत नाही हे पाहून आणि या खटल्याचे महत्व ओळखून त्यांनी कुठलेही शुल्क न घेता या खटल्याचे वकीलपत्र स्वीकारले आणि अत्यंत प्रभावीपणे जेधे जवळकर यांची बाजू त्यांनी कोर्टात मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा युक्तिवाद आणि मेहनत कामी आली आणि १८ ऑक्टोबर १९२६ रोजी सेशन्स जज्ज जे. डी. लॉरेन्स यांनी खटल्याचा निकाल दिला व जेधे, जवळकर, लाड व बागडे यांना निर्दोष मुक्त केले व त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम परत करण्याचा आदेश कोर्टाने दिला.
अशी प्रचंड Controversy झालेले हे पुस्तक वाचण्यात आले. चळवळीत काम करणाऱ्या आणि शिव-फुले-शाहू आंबेडकरी विचार बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचावेच असे हे पुस्तक.
आज क्रांतीबाचा पुतळा महानगरपालिका आवारात अभिमानाने उभा आहे. क्रांतीबा पुण्याच्या सांस्कृतिक दहशतवादाला जबर धक्का देणारा एक युगप्रवर्तक, युगपुरुष राहिला आहे. वारसा फक्त पुतळ्या पुरता आणि अभिवादन करण्या पुरता रहायला नको. वारसा हा विचारांचा असायला हवा. त्यासाठी पुस्तके वाचायला हवीत. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक येड्या गबाळ्यासमोर झुकत नसते… निदान आपल्या धडावर आपले डोके येते. #समजलंतरठीक
- पैगंबर शेख
(पुस्तक प्रेमी)



