फलटण नगरपरिषदेने अनेक वर्षांपासून शहरात बॅनर लावण्यावर बंदी घातलेली असताना देखील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच थेट बॅनर बंदीचा भंग केला आहे. निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे, जी आज २७ एप्रिल २०२५ रोजी संध्या ५:३० वाजता फलटणमध्ये दाखल होणार आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे बॅनर झळकले असून, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व वरिष्ठ नेत्यांसह पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर आणि फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचे फोटो झळकत आहेत.
फलटणमध्ये यापूर्वीही बॅनर बंदीचे उल्लंघन होत होते, मात्र यावेळी थेट सत्ताधारी पक्षानेच नियम धाब्यावर बसवल्याने, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
“सत्ताधाऱ्यांकडूनच जर नियमभंग होत असेल, तर इतरांकडून काय अपेक्षा करायची?” असा सवाल आता फलटणकर विचारू लागले आहेत.



