22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला झाला . या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले . नौजवान भारत सभा या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करते . या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांचे नागरिक आणि एक परदेशी नागरिकही ठार झाला आहे . हल्ल्याची जबाबदारी ’ द रेझिस्टन्स फ्रंट ’ नावाच्या अतिरेकी गटाने घेतली आहे , जो पाकिस्तानी अतिरेकी संघटना लश्कर – ए – तोयबाशी संबंधित आहे , असे मानले जाते . हल्ल्यादरम्यान पर्यटकांच्या जीवाच्या रक्षणासाठी आणि त्यांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी काश्मीरमधील घोडेवाले , हॉटेलवाले , ऑटोचालक आणि इतर सामान्य नागरिक झटले . त्यांनी पर्यटकांना पैशाशिवाय मदत केली . आदिल हुसेन नावाचा घोडेवाला पर्यटकांचे प्राण वाचवताना दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडला . पर्यटकांनीही कबूल केले की छोट्या – मोठ्या व्यवसायातील गरीब काश्मीरी लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले . या दहशतवादी हल्ल्याची काश्मीरमधील सामान्य जनतेनेसुद्धा तीव्र निंदा केली आहे . लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध दर्शविला आणि या हल्ल्याला काश्मीरियतवर हल्ला म्हटले आहे . याच्या विरोधात काश्मीरमधील मशिदींतून घोषणा करण्यात आल्या , तर सर्व राजकीय पक्षांनीही या कृत्याचा निषेध केला आहे . भारतीय मुख्य धारेच्या मीडियाने काश्मीरी लोकांची जी पूर्वग्रहदोषीत छबी बनवली आहे , ती सोशल मीडियावरील बातम्या , फोटो आणि व्हिडिओमुळे धुळीत मिसळली गेली आहे . तरीही या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर नक्कीच वाईट परिणाम होतील . त्यासोबतच , या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे केंद्र सरकारचे सर्व दावे खोटे ठरले आहेत .
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशातील न्यायप्रिय जनता दुःखी आणि रागात आहे . पण एक विषारी गट आहे ज्याच्या चेहर्यावर या अमानुष कृत्यानंतरही धूर्त हास्य झळकत आहे . संघ परिवार आणि भाजपशी जोडलेल्या विविध लंपट गटांचे चेहरे या दिवसांत खुश दिसत आहेत . त्यांना मुस्लिमांवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे . विविध राज्यांतून काश्मीरी विद्यार्थी आणि मुस्लिम कामगारांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत . धर्माच्या नावाने होणार्या संघी दहशतवादाच्या सर्व घटनांकडे डोळेझाक करून झोपण्याचे सोंग करणारा गोदी मीडिया या दहशतवादी हल्ल्याला धर्मवादी रंग देण्यात गुंतला आहे . भाजपने पाळलेला आयटी सेल विविध प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात रमला आहे . त्याद्वारे या हल्ल्याच्या विरोधात उभा राहिलेल्या प्रत्येक काश्मीरीला दहशतवादी ठरवण्यात आणि देशातील प्रत्येक मुस्लिमाला संशयाच्या चौकटीत ढकलण्यात येत आहे . पाकिस्तानचे भूत उभे करून प्रत्येक काश्मीरी आणि मुस्लिमाला हिंदुस्थानचा शत्रू ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत . आम्ही देशातील प्रत्येक न्यायप्रिय विद्यार्थी , तरुण आणि सामान्य जनतेला आवाहन करतो की भाजप आणि संघ परिवाराच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचले पाहिजे . यांच्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि चांगल्या पदांवर स्थायिक झाली आहेत , पण बेरोजगारीचा मार सहन करणार्या आपल्या भावंडांना आणि मुलामुलींना हे लोक नष्ट करण्यास मुळीच संकोच करणार नाहीत . म्हणून मित्रांनो , शिक्षण , रोजगार , आरोग्यसेवा आणि आवास यासारख्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र या ; धर्मवादी फॅसिस्टांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याच भावंडांशी वैर बाळगू नका . काश्मीरी आणि गरीब , स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ले करणार्या गुंडांचा आपल्या एकतेच्या बळावर सामना करा , कारण अन्यायाला मूकपणे पाहणे म्हणजे अन्यायात सहभागी होण्यासारखेच आहे .
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांची (पान 2 वर…)
(…पान 1 वरुन) जबाबदारी मोदी सरकारने घेतली पाहिजे . काश्मीर हे जगातील सर्वात जास्त सैन्यीकृत ठिकाणांपैकी एक आहे . असे असूनही पुलवामा सारखी घटना कशी घडू शकते , ज्यामध्ये चाळीस सैनिक ठार झाले ? आणि आता पहलगाम सारखी घटना कशी घडू शकते , ज्यामध्ये 27 निरपराधी लोकांचे प्राण गेले !? जर या हल्ल्यामागे खरोखर पाकिस्तानच हात असेल तर सीमा ओलांडून घुसखोरी कशी होऊ शकते ? मोदी सरकारने त्यांची छप्पन इंची छाती फुगवून नोटबंदीच्या सोबत दहशतवादाची कंबर मोडण्याचा दावा केला होता . त्यानंतर काश्मीरबद्दलचे कलम 370 आणि 35 – ए काढून टाकण्यात आले , जम्मू – काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेण्यात आला , डोमिसाइल नियमांमध्ये बदल करण्यात आले , काश्मीरच्या जनतेवर लाठीचार्ज करण्यात आला . पण त्यानंतरही दहशतवादाची कंबर मोडली असे दिसत नाही . निश्चितच जिथे न्याय नाही , तिथे शांतता असू शकत नाही . काश्मीरच्या सामान्य जनतेने दहशतवादाचा अंधारमय काळ पाहिला आहे आणि ती कधीही याची समर्थक नव्हती . पण या दडपशाहीनंतर निर्माण झालेला असंतोष विविध प्रकारच्या कट्टरवादी दहशतवादी संघटनांना वाढण्याची जमीन तयार करतो आहे.
पुलवामा प्रकरणाप्रमाणेच पहलगाम हल्ल्याच्या बाबतीतही खर्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे . पण हे नक्की आहे , की या घटनेचा येणार्या बिहार आणि बंगालमधील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात वापर होईल . कारगिल युद्धापासून ते काश्मीरमध्ये झालेल्या सर्व मोठ्या हल्ल्यांची वेळापत्रके आणि निवडणूक वेळापत्रक यांची तुलना केल्यास , काहीतरी गडबड असल्याचे दिसून येईल . फार दिवस झाले नाहीत , जेव्हा देवेंद्र सिंह नावाच्या डीएसपी रँकच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्याला हिड्बुल मुजाहिद्दीनच्या बक्षीसी दहशतवाद्यासोबत पकडण्यात आले होते . पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या मृत्यूच्या नावाखाली जिंगोइझम , अंधराष्ट्रवाद आणि युद्धोन्माद भडकवून मतांसाठी भीक मागणार्यांची खरी वृत्ती कोणापासून लपलेली नाही . 80 च्या दशकानंतर काश्मीरमध्ये जेव्हा – जेव्हा दहशतवादाचे विष पसरले आहे , तेव्हा – तेव्हा याचा सर्वात मोठा फायदा धर्मवादी फॅसिस्टांनीच उठवला आहे . आणि याचा सर्वात जास्त तोटा काश्मीरमधील सर्व जाती – धर्माच्या लोकांना सोसावा लागला आहे.
आम्ही मागणी करतो की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची पूर्ण तपासणी व्हावी . या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला द्यावा आणि जखमी झालेल्यांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरवली जावी . याचबरोबर , काश्मीरला भेट देणार्या पर्यटकांना , तेथील सरकारी कर्मचार्यांना , प्रवासी मजुरांना आणि सर्व सामान्य नागरिकांना जीवन – मालमत्तेच्या सुरक्षेची हमी मिळावी . देशभरातील विविध राज्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांना आणि रोजगारासाठी जाणार्या मजुरांना आवश्यक संरक्षण दिले जावे . काश्मीरमध्ये खरी शांतता तेव्हाच प्रस्थापित होऊ शकते , जेव्हा काश्मीरी जनतेला त्यांचे सर्व राजकीय आणि आर्थिक हक्क प्राप्त होतील.
पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्याचा बहाणाकरून देशाला धर्मवादाच्या आगीत झोकून देण्याचासंघपरिवाराचा डाव हाणून पाडा
Leave a comment



